परभणी, (प्रतिनिधी): खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उत्पादक, विक्रेते व स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत परभणीत शनिवार (दि.24) व रविवार (दि.25) रोजी ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ या उपक्रमाचे प्रदर्शन वैष्णवी मंगल कार्यालय, नांदखेडा रोड, परभणी येथे सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
या प्रदर्शनात विविध प्रकारच्या वस्तू, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, कपडे, घरगुती उत्पादने, कलात्मक वस्तू, ज्वेलरी आदी उत्पादनांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. स्थानिक उत्पादक व विक्रेत्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी या माध्यमातून मिळणार असून, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक उद्योजकांना व्यवसायवृद्धीसाठी संधी उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना दर्जेदार व विश्वासार्ह उत्पादने खरेदी करता यावीत, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या प्रदर्शनामुळे स्थानिक उत्पादक व ग्राहक यांच्यात थेट संपर्क निर्माण होऊन लघुउद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींमधील घटकांना इतर शासकीय संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी संस्था कार्यरत आहे.
या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बेत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार आदी समाजघटकांचा समावेश असल्याचे संस्थेने नमूद केले आहे. या समाजघटकांतील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र व्यक्तींना संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो.
स्थानिक उद्योजक, उत्पादक व विक्रेत्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी नागरिकांनी कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन अमृत संस्थेचे परभणी जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे.
*-*-*-*-*


