लातूर (प्रतिनिधी) नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्याकडील पोलीस पथक लातूर जिल्ह्यात रवाना केले होते. सदर पथकाने, दिनांक 22.10.2026 रोजी लातूर जिल्हयातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत पाच दिगांबर चौकातील दगडू शेठ यांचे जागेतील पत्र्याचे शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका बुकीवर कारवाई करत, त्या ठिकाणाहून 9,890/-रुपयांची रोकड व 57,000/- रुपयांचे (11) मोबाईल असा एकूण 66,890/- रुपयांचा मुद्दमाल जप्त केला असून, नमूद प्रकरणात एकूण (9) इसमांविरुध्द कारवाई करुन, त्यांचेविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुरनं 749/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदयान्वये गुन्हा नोंदविला आहे.
त्याचप्रमाणे, मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर येथील अप्पा मस्के याचे पत्र्याचे शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत, 18,030/-रुपयांची रोकड, (8) मोबाईल व (4) मोटार सायकली असा एकूण 2,80,030/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, नमूद प्रकरणात एकूण (6) इसमांविरुध्द कारवाई करुन, त्यांचेविरुध्द मुरुड पोलीस ठाणे येथे गुरनं 368/2026 कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.
अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध लातूर जिल्ह्यातून काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने, विशेष पथकाने, रात्री 23.55 वाजता मौजे सुल्लाळी शिवारातील वाळू धक्क्यावर कारवाई केली असता, तिरु नदीच्या पात्रातून पोकलेनच्या सहाय्याने अवैधरित्या वाळूचा उपसा करुन तिची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. सदर कारवाईत पथकाने, (1) पोकलेन मशिन, (2) ट्रॅक्टर व नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली वाळू, असा एकूण 59,05,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नमूद प्रकरणात (3) इसमांविरुध्द कारवाई करुन, त्यांचेविरुध्द जळकोट पोलीस ठाणे येथे गुरनं 316/2026 कलम 303 (2), 3(5) भारतीय न्याय संहिता, कलम 48 (7), 48 (8) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमा अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
उपरोक्त तिन्हीही कारवायांत, पथकाने एकूण (18) इसमांकडून 27,920/- रुपयांची रोकड, (19) मोबाईल, (1) पोकलेन मशिन, (2) ट्रॅक्टर असा एकूण 62,51,950/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ/ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ/ गणेश राठोड, पोहेकॉ/ संदिप वाघाडे व पोहेकॉ/ गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
‘ खबर ‘ हेल्पलाइन वरुन माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे


