परभणी,(प्रतिनिधी) : लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणीवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणार्या आरोपीला परभणी न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गणेश नामदेवराव कुलदीपके (वय 45) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याचा निकाल अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. डी. गौतम यांनी दिला आहे.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, 3 ऑगस्ट 2020 रोजी फिर्यादी तरुणी काम करत असलेले दुकान बंद झाल्यानंतर ती दुकानासमोर आपल्या वडिलांची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी तीच्या मावस बहिणीचा नवरा आरोपी गणेश कुलदीपके हा तेथे आला आणि तू माझ्याशी लग्न का करत नाहीस? असे म्हणून तिला शिवीगाळ करत मारहाण करू लागला. बाजूच्या दुकानातील मुलगा मध्यस्थी करण्यासाठी आला असता आरोपीने कमरेला लावलेला कोयता काढून तरुणीच्या दोन्ही हातांवर व पोटरीवर वार करून तिला गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर जखमी तरुणीने दिलेल्या जबाबावरून नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड यांनी करून तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. डी. गौतम यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. व्ही. के. पोटफोडे यांनी भक्कम बाजू मांडत एकूण 10 साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी, जप्ती पंच, घटनास्थळ पंच, तपास अधिकारी यांची साक्ष आणि रासायनिक विश्लेषण अहवाल (फॉरेन्सिक रिपोर्ट) अत्यंत महत्त्वाचा ठरला.
पुराव्यांच्या आधारे न्यायाधीशांनी आरोपी गणेश कुलदीपके याला दोषी ठरवून भारतीय दंड संहिता कलम 324 अन्वये 2 वर्षे सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंड (दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास), तसेच शस्त्र कायदा कलम 4/25 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
सदर खटल्यात पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, महिला पोलीस अंमलदार वंदना आदोडे आणि पोलीस नाईक बी. बी. जवादे यांनी पैरवी कामकाज पाहिले.


