परभणी,(प्रतिनिधी) : सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक विकासासाठी प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणारे ज्ञानोपासक महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रशांत वक्ते यांच्या सेवापूर्ती निमित्त मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया यांच्या वतीने रविवार 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात भव्य सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. वक्ते यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या अध्यापनाबरोबरच संशोधन, नवकल्पना, प्रयोगात्मक शिक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सातत्याने मोलाचे योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विषयाविषयी आवड निर्माण करणे, संशोधनवृत्ती जोपासणे, प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणे तसेच सहकारी प्राध्यापक व संशोधकांना मार्गदर्शन आणि सहकार्य करणे ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये राहिली आहेत. त्यांच्या ज्ञानसमृद्ध अध्यापनाचा, संशोधननिष्ठ कार्याचा, विषयाप्रती असलेल्या समर्पणाचा आणि प्रेरणादायी मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोज समितीने दिली.


