परभणी, (प्रतिनिधी) -जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी विभाग प्रमुखांनी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गरजू नागरिकांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचवावेत. तसेच विविध विभागांकडील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिले.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विभागनिहाय कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न, विविध विभागांसमोरील अडचणी, प्रलंबित कामांची सद्यस्थिती तसेच शासनाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेबाबत माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना, विशेषतः शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांचे प्रभावी नियोजन करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी. नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
*प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर*
विविध विभागांकडे प्रलंबित असलेली कामे विनाकारण प्रलंबित राहणार नाहीत, याची संबंधित विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी. प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन ती तातडीने मार्गी लावावीत. शासनाने दिलेली उद्दिष्टे आणि निर्धारित केलेली कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक असून, त्यासाठी विभागाने स्वतंत्र नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले.
शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांच्या प्रश्नांचे वेळेत निराकरण करणे आणि प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करणे यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. योजनांची अंमलबजावणी करताना केवळ उद्दिष्टपूर्ती न करता त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळतो की नाही, याकडेही संबंधित विभागांनी लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
*विभागांमध्ये समन्वय ठेवून कामे पूर्ण करा*
जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध कामे प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी परस्परांशी समन्वय ठेवणे आवश्यक आहे. एका विभागाच्या कामाचा दुसऱ्या विभागाशी संबंध असल्यास संबंधित विभागांनी एकत्रितपणे प्रश्न सोडवावेत. समन्वयाच्या अभावामुळे कोणतेही काम रखडणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच कामांची अचूकता, गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन यांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून प्रशासनाचे कामकाज अधिक परिणामकारक करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून कामांचा नियमित आढावा घ्यावा आणि निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करणे, या बाबींना विभाग प्रमुखांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अप्पर जिल्हाधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, शैलेश लाहोटी, युवराज डापकर आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी उपस्थित जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्या. भूषण काळे यांनी पालम येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कायदेविषयक व शासकीय योजनांच्या माहितीविषयक शिबिरासाठी सर्व विभागप्रमुखांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
***


