परभणी,(प्रतिनिधी) : परभणी आणि मानवत तालुक्यातील माथ्यावरील तसेच पावसावर अवलंबून असलेल्या 54 गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी 60 दलघमी पाण्याची आवश्यकता असल्याचे शासनाच्या जलसंपदा विभागाच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. या गावांना पिण्याचे पाणी आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोकणातून दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणी वळविण्याच्या योजनेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांना दिलेल्या पत्रातून समोर आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या या 54 गावांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
सन 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 17 मार्च 2025 रोजी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या औचित्याच्या मुद्दा क्रमांक 86 च्या अनुषंगाने जलसंपदामंत्री डॉ. विखे पाटील यांनी 4 नोव्हेंबर 2026 रोजी हे उत्तर दिले आहे.
शासनाच्या उत्तरानुसार, परभणी आणि मानवत तालुक्यातील 54 गावांना पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 60 दलघमी पाण्याची आवश्यकता असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, 14 ऑक्टोबर 2021 च्या पत्रानुसार मध्य गोदावरी खोर्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन पूर्ण झाले असल्याने या खोर्यातून अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यावर मर्यादा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोकणातून पाणी वळविण्याच्या योजनांना 23 ऑगस्ट 2019 आणि 19 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयांनुसार तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून 78 अघफू (सुमारे 2209 दलघमी) पाणी वळविण्यासाठी पूर्वव्यवहार्यता अहवाल तयार करण्यात आला आहे. या योजनेचा समरूपता अभ्यास करून अहवाल राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.
याशिवाय पाणी वळविण्याच्या योजनेसाठी सर्वेक्षण, अन्वेषण आणि अंदाजपत्रके तयार करण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही उत्तरात नमूद करण्यात आले आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषण करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष किती क्षेत्र सिंचनाखाली आणता येईल आणि किती पाणी उपलब्ध करून देता येईल, हे निश्चित होणार आहे.
54 गावांचा प्रश्न केवळ आश्वासनांनी सुटणार नाही!
कोकणातून मराठवाड्यात पाणी वळविण्याच्या योजनेची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती निश्चितच दिलासादायक असली, तरी प्रत्यक्ष पाणी गावांपर्यंत पोहोचण्यासाठी अद्याप अनेक टप्पे पार करावे लागणार आहेत. त्यामुळे या योजनेच्या पुढील प्रक्रियेला गती देणे, सर्वेक्षण व अन्वेषणासाठी तातडीने प्रशासकीय मान्यता देणे, 54 गावांसाठी आवश्यक असलेल्या 60 दलघमी पाण्याचे स्वतंत्र नियोजन करणे आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठा व सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक आहे. दुष्काळाच्या झळा सोसणार्या या गावांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध झाल्यास शेती, पशुधन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नाला प्राधान्य देऊन केवळ कागदोपत्री प्रक्रिया न करता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा 54 गावांतील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
संघर्ष समितीचा पाठपुरावा सुरूच राहणार…
परभणी आणि मानवत तालुक्यातील 54 गावांचा पाणीप्रश्न हा केवळ पिण्याच्या पाण्यापुरता मर्यादित नसून शेतकर्यांच्या शेती आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्याशी जोडलेला आहे. शासनाच्या उत्तरातून या प्रश्नासाठी पाणी उपलब्धतेच्या पर्यायाची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट झाले, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, केवळ सर्वेक्षण आणि प्रशासकीय प्रक्रियेपुरते हे काम मर्यादित न राहता त्याला निश्चित कालमर्यादा देऊन प्रत्यक्ष पाणी गावांपर्यंत पोहोचविण्याची कार्यवाही व्हावी. या 54 गावांना कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया 54 गाव पाणी संघर्ष समितीचे संतोष देशमुख यांनी व्यक्त केली.
या 54 गावांचा आहे समावेश…
परभणी तालुक्यातील मांडाखळी, डफवाडी, उमरी, बाभळगाव, उजळअंबा, नरसापूर, नागापूर, सोन्ना, जांब, आळंद, मोहपुरी, पान्हेरा, भोगाव, किन्होळा, पेडगाव, कौडगाव, पारवा, तुळजापूर, गव्हा, गोविंदपूर, आर्वी, टाकळी (कु.), धर्मापुरी, शहापूर, हसनापूर, इस्माईलपूर, एकुरखा, पिंपळगाव, ब्रह्मपुरी तर्फ पेडगाव, वडगाव, कष्टगाव आणि सारंगपूर तसेच मानवत तालुक्यातील पिंपळा, पाळोदी, सावळी, सावरगाव, देवलगाव अवचार, हत्तलवाडी, आंबेगाव, बोंदरवाडी, खडकवाडी, नागरजवळा, मानोली, करंजी, खरबा, रुढी, मानवत रोड, कोल्हावाडी, कोल्हा, जंगमवाडी, मांडवडगाव, सोनुळा, ताडबोरगाव आणि मानवत या गावांचा समावेश आहे.


