परभणी,(प्रतिनिधी) : ऑल इंडिया इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने विमा निवृत्ती वेतनधारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवार 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर तसेच सर्वसाधारण विमा कंपनीच्या प्रादेशिक कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत.
या आंदोलनात पेन्शन अपडेट करणे, रोख वैद्यकीय भत्ता सुरू करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे, मेडिक्लेम योजनेत सुधारणा करणे, ऑगस्ट 1997 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांना 100 टक्के महागाई भत्ता निष्प्रभ करणे, 1986 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्यांच्या सानुग्रह अनुदानात भरीव वाढ करणे, मेडिक्लेमवरील जीएसटीचा भार व्यवस्थापनाने उचलणे, तसेच 80 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या निवृत्ती वेतनधारकांच्या मूळ निवृत्ती वेतनात वाढ करणे, अशा विविध मागण्या करण्यात येणार आहेत.
विमा क्षेत्रातील निवृत्ती वेतनधारकांचे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असून, त्यांचे तातडीने निराकरण होणे आवश्यक आहे. या मागण्यांकडे व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व विमा निवृत्ती वेतनधारकांनी 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता संबंधित कार्यालयांसमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विमा कामगार संघटना, नांदेड युनिटचे अध्यक्ष कॉम्रेड शमशोदिन शेख यांनी केले आहे.


