परभणी, (प्रतिनिधी) : विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी तसेच संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परभणी जिल्ह्यात १६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) लागू करण्यात आले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी आदेश जारी केले आहेत.
२० नोव्हेंबर रोजी संत नामदेव महाराज व टिपू सुलतान जयंती, २४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती, तर २८ नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी आहे. या कार्यक्रमांसह जिल्ह्यात राजकीय पक्ष व विविध संघटनांकडून अचानक मोर्चे, निदर्शने, धरणे, रास्तारोको आदी आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे.
या आदेशानुसार शासकीय कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या परिसरात शस्त्रे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या तसेच शारीरिक इजा होऊ शकेल अशा वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दाहक व स्फोटक पदार्थ, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे जवळ बाळगणे, जमा करणे अथवा तयार करणे यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
याशिवाय सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती किंवा मृतदेहांच्या प्रतिमा प्रदर्शित करणे, आरडाओरड करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे तसेच सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता व नीतिमत्तेला बाधा पोहोचविणारी किंवा राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी भाषणे, अंगविक्षेप, विडंबन, चित्रे, चिन्हे व फलक यांचे प्रदर्शन किंवा प्रसार करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच मिरवणुका काढण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तथापि, पोलीस अधिकारी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या कर्तव्याशी संबंधित कामकाजाला या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा आणि सक्षम अधिकाऱ्यांनी विशेष परवानगी दिलेल्या मिरवणुका व कार्यक्रमांनाही हा आदेश लागू राहणार नाही.
विशेष मिरवणुका व कार्यक्रमांना परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, परभणी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
*३० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू*
हा प्रतिबंधात्मक आदेश १६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ३० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण परभणी जिल्ह्यात लागू राहणार आहे.
जिल्ह्यात शांतता, सार्वजनिक सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
***


