परभणी,(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्वांत लहान बुद्धिबळपटू श्रीनिधी देशमुख हिने बुद्धिबळाच्या रॅपिड प्रकारात 1,405 रेटिंग मिळवत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केले आहे. देवगिरी ग्लोबल अकॅडमीमध्ये इयत्ता दुसरीत शिकणार्या श्रीनिधीने वयाच्या अवघ्या साडेसातव्या वर्षी हे यश संपादन केले.
श्रीनिधीने कोल्हापूर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच पुणे, जालना, यवतमाळ, पुसद आणि वाशिम येथे झालेल्या अखिल भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धांमध्ये पदक, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र मिळवून विशेष प्रावीण्य दाखवले आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळणार्या श्रीनिधीला तिचे वडील बुद्धिबळपटू अॅड. राजेश देशमुख झरीकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


