परभणी, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी आणि जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारकांना या सुविधेचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखांमध्ये विशेष जनजागृती व डिजिटल जीवन प्रमाणपत्र नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असून, ही मोहीम ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
शासनाच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी सादर करावे लागणारे हयातीचे प्रमाणपत्र आता ‘जीवन प्रमाण’ या डिजिटल सुविधेद्वारे सादर करता येते. या सुविधेबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी प्रत्येक बँक शाखेच्या प्रवेशद्वाराजवळ आकर्षक डिजिटल बॅनर किंवा डिस्प्ले लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच निवृत्तीवेतनधारकांना मार्गदर्शन व प्रत्यक्ष सहाय्य करण्यासाठी प्रत्येक शाखेत प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करून त्यांना आवश्यक स्मार्टफोन व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या मोहिमेअंतर्गत सर्व बँकांनी त्यांच्या शाखांमधील निवृत्तीवेतनधारक खातेदारांना मोठ्या प्रमाणावर एसएमएस पाठवून मोहिमेची माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः अंथरुणाला खिळलेले, आजारी व अतिवृद्ध निवृत्तीवेतनधारकांना बँकेत येणे शक्य नसल्यास त्यांच्या घरी भेट देऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्र नोंदणी करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चेहरा प्रमाणीकरणाद्वारेही सादर करता येणार जीवन प्रमाणपत्र
निवृत्तीवेतनधारकांना ‘जीवन प्रमाण फेस ॲप’ आणि ‘आधार फेस आरडी’ या ॲपच्या सहाय्याने चेहरा प्रमाणीकरण करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येते. या सुविधेचा वापर कसा करावा, याबाबतही बँकांमार्फत निवृत्तीवेतनधारकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी आधार क्रमांक, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, पीपीओ क्रमांक आणि बँक खात्याचा तपशील ही आवश्यक माहिती सोबत ठेवावी. याबाबत अधिक माहिती जीवन प्रमाणच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रत्येक बँक शाखेत मार्गदर्शन व मदत केंद्र उपलब्ध करून देण्याबरोबरच निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणी व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मोहिमेचा नियमित आढावा घेऊन जिल्हा कोषागार अधिकारी, परभणी यांच्याशी समन्वय साधण्यासही सांगण्यात आले आहे.
तरी परभणी जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
*-*-*-*-*-*


