परभणी (प्रतिनिधी) गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागामार्फत सुरू असलेल्या कारवाईअंतर्गत आज गौण खनिज भरारी पथकाने अवैध रेतीची वाहतूक करणारा हायवा पकडून तहसील कार्यालय, परभणी येथे जमा केला.
मा. उपविभागीय अधिकारी, परभणी श्री भोसले व मा. तहसीलदार श्री राजापूरे, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिज भरारी पथकाने ही कारवाई केली. अवैध रेतीने भरलेला हायवा वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पथकाने सदर वाहन ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात जमा केले.
या कारवाईमध्ये पथक प्रमुख विकास आगलावे, ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर लोखंडे, रविंद्र राठोड व लासे मन्मथ यांनी सहभाग घेतला. तसेच ताडकळस पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल श्री. भोसले यांनीही या कारवाईस मोलाचे सहकार्य केले.
महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांमध्ये धडकी भरली असून, अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.


