परभणी (प्रतिनिधी) नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या तरुणाच्या अपहरण प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून, या प्रकरणाचा तपास करताना अनैतिक संबंधातून झालेल्या हत्येचा गुन्हा उघडकीस आला आहे. परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) या प्रकरणात एका महिलेसह तिच्या दोन मुलांना ताब्यात घेत गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.
कसा घडला प्रकार?
शेख युनूस शेख युसूफ (मयत) हा २४ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घरातून ऑटो घेऊन बाहेर पडला होता. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. याबाबत त्यांच्या आई सुलताना बेगम शेख युसूफ यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.
कॅनॉलमध्ये आढळला ऑटो आणि मृतदेह
तपासादरम्यान बेपत्ता तरुणाचा ऑटो कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दर्गा परिसरातील कॅनॉलमध्ये आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी शहरातून जाणाऱ्या कॅनॉल परिसरात शोधमोहीम राबवली असता, नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलसा शिवारात शेख युनूस याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.
तपासात धक्कादायक बाब समोर
मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयावरून एका महिलेसह तिच्या दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. आरोपी महिलेकडे विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिचे आणि मयत शेख युनूस यांचे मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. याच अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी नानलपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांची यशस्वी कामगिरी
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सवंडकर, पोहेकॉ. रणजित आगळे, मुकेश बुधवंत, विलास सातपुते, पांडुरंग तुपसुंदर, गिते, पोलीस शिपाई चव्हाण, पुरी, परसोडे तसेच नानलपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली


