सेलू (प्रतिनिधी) पुर्वजांचा इतिहास जाणून घेतल्याने मनाची घडण होते. अंगात सामर्थ्य संचारते. आपल्या घरण्याविषयी अभिमान वाटू लागतो. त्यामुळे पुर्वजांच्या गौरवशाली इतिहासाचे चिरंतन स्मरण ठेवा कारण ते प्रेरणादायी असते. असा संदेश अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी दिला.
शहरातील नूतन विद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या हनुमानगढ परिसरात शुक्रवार ( दि. १८ ) रोजी राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ओजस्वी व अमोघ अमृत वाणीतून सुरू असलेल्या रामकथेचे चौथे पुष्प भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. रामकथेसाठी जगन्नाथधामचा देखणा मंच उभारण्यात आला होता. पुढे स्वामीजी म्हणाले की, ‘ आयुष्य नश्वर आहे. त्यामुळे योग्य ध्येय निश्चित केले पाहिजे. ज्यांची मन घडतात त्यांच्याकडून महान कार्य सिद्धीस जातात. स्वतःतील आत्मविश्वास जागवा. स्वतः चूक करू नका पण, ज्यांच्याकडून चूक घडली त्यांच्याविषयी अंतकरणात करूणा असू द्या. आपले मन, मेंदू, मनगट मजबूत करा आणि जीवनामध्ये आपण काय कार्य करायला जन्मलोत हे समजून घ्या. तरच आपले जीवन सुखी, समृद्ध आणि सुंदर होईल. ” असेही ते म्हणाले. कथा श्रवणासाठी महिला -पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सुत्रसंचलन प्रा. संजय पिंपळगावकर यांनी केले.