परभणी ( प्रतिनिधी) परभणी तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात 96-परभणी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने मतदारसंघातील निवडणूक लढविणाऱ्या 15 उमेदवारांच्या खर्च नियमनासाठी मंगळवार, 5 नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी दुपारी 3 वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठक निवडणूक खर्च निरीक्षक राहूल मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
महत्त्वाचे म्हणजे, या निवडणुकीत उमेदवारांच्या खर्च मर्यादेत 12 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ही मर्यादा 28 लाख होती, जी आता वाढवून 40 लाख रुपये करण्यात आली आहे.
यावेळी परभणीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ संदीप राजपुरे, जिल्हा कोषागार अधिकारी नीलकंठ पाचंगे, खर्च पथकाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हा कोषागार अधिकारी नीलकंठ पाचंगे यांनी निवडणूक खर्चाचे नियम आणि त्यांचे पालन याबाबत उमेदवारांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच, निवडणूक खर्चाच्या तपशिलांचा सुयोग्य आढावा घेण्याच्या सूचनाही दिल्या.
या बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षकांनी प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या खर्च नोंदणी प्रक्रियेची महत्त्वपूर्ण माहिती दिली. निवडणूक प्रक्रियेत खर्चाचे पारदर्शक पालन सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन उमेदवारांना करण्यात आले.


