नूतन कन्या प्रशालेत संविधान दिन साजरा
सेलू (प्रतिनिधी) भारतीय संविधानाने आपल्याला जशी मुलभूत अधिकार दिली आहेत. तशीच कर्तव्यही दिली आहेत. तेव्हा विद्यार्थी आणि नागरिकांनी आपल्याला मिळालेल्या मुलभूत अधिकारासह कर्तव्याची जाणीवही ठेवावी. एक आदर्श आचारसंहिता असलेले भारतीय संविधान हा मानवतावादी धर्म ग्रंथ आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. ते श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने शासनाच्या ‘ हर घर संविधान ‘ उपक्रमांतर्गत मंगळवार ( दि. २६ ) रोजी आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक निशा पाटील या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी हे होते. तर मंचावर उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहीदास मोगल, डॉ. सुरेश हिवाळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी म्हणाले की, ‘ भारतीय संविधानाने स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिले आहेत. भारतीय संविधान सामान्य माणसांच्या जगण्याचा पाया आहे. सर्व सामान्यांच्या उन्नतीचे मार्ग संविधानानेच खुले झाले आहेत. ‘ असेही ते म्हणाले. संविधान दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक विभागाच्या वतीने मैथिली गावंडे, जागृती ताठे , अपेक्षा कांगणे, हर्षदा गलबे, ज्ञानेश्वरी जाधव ,भक्ती शेलार, अक्षरा गायकवाड, रुक्सार बकाली या विद्यार्थीनींनी तयार केलेल्या ‘ भारतीय संविधान लोकशाही व समता ‘ या भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात पी.एच.डी. पदवी मिळाल्याबद्दल डॉ. सुरेश हिवाळे यांचा कन्या प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन वैशाली चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन किर्ती राऊत यांनी केले. तर आभार प्रदर्शन शशिकांत देशपांडे यांनी केले.


