परभणी (प्रतिनिधी) मानवी जीवनात सेवाभाव अतिशय महत्त्वाचा असून तो प्रत्येक माणसांनी अंगी रूजवला पाहिजे. जनसेवा हिच ईश्वर सेवा हा विचार स्वीकारून प्रत्येकाने जनसेवेचा वसा घेतला पाहिजे. ही जनसेवा वेगवेगळ्या पध्दतीने करता येते. त्यामध्ये रक्तदान ही सुद्धा सर्वश्रेष्ठ जनसेवा आहे. ज्यामुळे अनेकांना जीवदान देता येवू शकते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे ब्राम्हणगाव ता.जि.परभणी येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबिराच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यात जवळपास नव्वद व्यक्तीची विविध रोगनिदान व नेत्रतपासणी डॉ. विजयसाई शेळके, डॉ. अरूण लांडे, श्री. जुमडे साहेब व श्रीसत्यसाई सेवा समिती परभणी यांच्या तर्फे करण्यात आली. तर शासकीय रुग्णालय परभणी च्या रक्तपेढीसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. कल्याण गोपनर, सहायक कार्यक्रमाधिकारी प्रा. योगेश कु-हाडे, शिबिरार्थी विद्यार्थी हर्षराज कांबळे, विकास राउत, विष्णू विधाटे, प्रभाकर इंगळे, यांच्यासह 50 गावकऱ्यांनी रक्तदान केले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय खंदारे यांनी केले, तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिबिरातील विद्यार्थी व गावक-यांनी सहकार्य केले.



