परभणी(प्रतिनिधी) सातारा येथील पत्रकार तुषार खरात विरोधात आकसबुध्दीने दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच त्यांची त्वरीत सुटका करण्यात यावी अशी मागणी आज परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं जिल्हाधिकार्यांच्या मार्फत करण्यात आली.
सातारा येथील लई भारी या युट्यूब चॅनलचे संपादक तुषार खरात यांच्यावर विनयभंग, अॅट्रॉसिटी, पाच कोटीची खंडणी आदी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून तुषार खरात हे तुरुंगातून बाहेर येवूच नयेत यासाठी ही कारवाई करण्यात आली. त्याच बरोबर या माध्यमातून तमाम पत्रकारांध्ये दशहत निर्माण करण्याचा देखील प्रयत्न झाला आहे. या घटनेचा मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात बातम्या दिल्यानंतर लगेच तुषार खरात यांच्यावर एका पाठोपाठ एक असे गुन्हे दाखल झाले आहेत. हे दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, तसेच त्यांची त्वरीत सुटका करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलीय.
निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नाईकवाडे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, महानगराध्यक्ष शिवशंकर सोनुने, डिजीटल मिडीयाचे महानगराध्यक्ष राहूल वहिवाळ यांच्यासह रामचंद्र कोठेकर, आकाशदिप लंगोटे, अरुण रणखांबे, लक्ष्मीकांत बनसोडे, राहूल डोंगरे,सुहास पंडित, संघपाल अढागळे, बालाजी कांबळे, सय्यद जमिल, बाळासाहेब घिके, संजय घनसावंत, रियाज कुरेशी, राहूल धबाले आदींच्या स्वाक्षर्या आहेत.