परभणी (प्रतिनिधी) परभणी तालुक्यातील उखळद येथील ह भ प जगन्नाथ महाराज हेंडगे यांचा खून करणाऱ्या संस्थाचालकाला अटक करा अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभेत करताच विधानसभा अध्यक्षांनी हा प्रकार गंभीर असून यावर तात्काळ शासनाने निवेदन सादर करावे अशा सूचना दिल्या आहेत.
परभणी तालुक्यातील उखळद येथील ह भ प जगन्नाथ महाराज हेंडगे हे झिरो फाटा येथील हायटेक निवासी विद्यालयात मुलीची टी.सी. आणण्यासाठी गेले असता तेथे त्यांना संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण या दोघांनी अमानुषपणे मारहाण केली यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणात पूर्णा पोलीस ठाण्यात संस्थाचालक पती-पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून दोन्ही आरोपी फरार आहेत त्यामुळे आ.डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी हा मुद्दा उचलून धरला.शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना असून खून करणाऱ्या फरारी पती-पत्नीला अटक कधी करणार आणि त्या वादग्रस्त संस्थेवर बंदी घालणार का असा प्रश्न आ. पाटील यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याची दखल घेत हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे शासनाने बुधवार सायंकाळपर्यंत यावर आपले निवेदन सादर करावे अशा सूचना शासनाला दिल्या आहेत. आ.पाटील यांनी विधानसभेत या प्रकरणावर आवाज उठवला आहे.