परभणी (प्रतिनिधी) : परभणी महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने उमेदवार निवड प्रक्रियेला गती देत विशेष निवडणूक पूर्वतयारी कार्यशाळा आणि मुलाखत सत्राचे आयोजन केले आहे. पक्षाच्या उमेदवार निवडीसाठी ठोस व काटेकोर पद्धतीचा अवलंब करण्याच्या उद्देशाने हे सत्र आयोजित करण्यात आले असून परभणीतील सर्व पातळ्यांवरील इच्छुक उमेदवारांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विभागीय संघटन मंत्री मा.श्री. संजयजी कौडगे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य मंत्री व जिल्हा निवडणूक प्रभारी मा.ना.सौ. मेघनादीदी बोर्डीकर–साकोरे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच परभणी ग्रामीण निवडणुक प्रमुख मा.आ.श्री. रामप्रसादजी बोर्डीकर आणि परभणी महानगर निवडणुक प्रमुख मा.आ.श्री. सुरेशराव वरपूडकर यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
________________________________________
१६ प्रभाग, ४ जिल्हा परिषद सर्कल, ११ पंचायत समिती सर्कलमध्ये मुलाखती
भाजपने शहर ते ग्रामीण स्तरावरील इच्छुकांसाठी मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
• महानगरपालिका: परभणी शहरातील सर्व १६ प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार.
• जिल्हा परिषद: झरी, टाकळी बोबडे, टाकळी कुंभकर्ण आणि पिंगळी अशा ४ सर्कलमधील उमेदवारांची मुलाखत.
• पंचायत समिती: झरी, साडेगाव, टाकळी बोबडे, नांदगाव खुर्द, टाकळी कुंभकर्ण, नांदापुर, पिंगळी, असोला, जांब, उखळद व ब्राह्मणगाव या ११ सर्कलमधील इच्छुक उमेदवारांची मुलाखत होणार आहे.
पक्षाच्या उमेदवार निवडीतील पारदर्शकता, क्षेत्रनिहाय अभ्यास आणि संघटनात्मक बळकटी यावर या मुलाखतींद्वारे भर देण्यात येणार आहे.
____________________________________
कार्यशाळेत निवडणूक तंत्रज्ञानावर भर
निर्धारित कार्यशाळेत पुढील महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे—
• प्रभाग व सर्कल रचना, चतुशीमा व मतदारसंघ विश्लेषण
• उमेदवारी अर्ज व कागदपत्रांची शास्त्रीय तयारी
• सोशल मीडिया, डिजिटल प्रचार व आधुनिक निवडणूक पद्धती
• बूथ व्यवस्थापन, वॉर रूम संचालन
• डेटा विश्लेषण, सर्वेक्षण, GIS व AI चा प्रभावी वापर
• निवडणूक रणनीतीची आखणी
प्रमुख वक्ते विनय बत्तडसर आणि धनंजय खांदिलकर यांचे मार्गदर्शन इच्छुकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
________________________________________
दिनांक, वेळ व स्थळ
• दिनांक: सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५
• वेळ: संध्याकाळी ४.०० वा.
• स्थळ: शिवाजी महाविद्यालय हॉल, वसमत रोड, परभणी
________________________________________
ही कार्यशाळा भाजपा परभणी महानगरचे जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजीराव भरोसे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली असून “निवडणुकीपूर्व तयारी मजबूत करण्यासाठी ही संधी सर्व इच्छुकांनी वेळेवर उपस्थित राहून घ्यावी”, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.


