परभणी : उखळद, ता.जि. परभणी येथील स्व. ह.भ.प. भागवताचार्य जगन्नाथ महाराज हेंडगे उर्फ पिंटू महाराज यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी असून, संपूर्ण समाजमनाला हादरवून टाकणारी आहे. या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी आज परभणी शहरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला.
घटनेने व्यथित झालेल्या पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत भारतीय जनता पार्टी परभणी महानगरचे जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांनी पुढाकार घेत दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली. या मदतीने कुटुंबाला थोडासा आधार मिळेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
शिवाजी भरोसे यांनी या प्रसंगी सांगितले की, “ही केवळ एक व्यक्तिगत मदत नसून अन्यायाविरोधातील लढ्याला समर्थन आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू.”


