परभणी (प्रतिनिधी)छ त्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली औरंगजेबाची कबर तात्काळ हटविण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने सोमवारी दि.17 सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती देण्यासाठी आज शनिवारी (दि.15) पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी विहिंपचे क्षेत्रीय मंत्री अनंत पांडे, वेदशास्त्रसंपन्न बाळुगुरू असोलेकर, विहिंपचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे, जिल्हामंत्री अॅड.राजकुमार भांबरे, जिल्हा सहमंत्री मनोज काबरा, गोरक्षाप्रमुख शिवप्रसाद कोरे, शहरमंत्री अभिजित कुलकर्णी हे उपस्थित होते. विहिंपचे जिल्हा मंत्री भांबरे यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी तालुका व जिल्हास्तरावर प्रशासनाला निवेदन दिले जाणार आहे. तर काही ठिकाणी धरणे आंदोलन केले जाईल. परभणीत सोमवारी (दि.17) सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी सर्व हिंदू संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक एकत्र येणार आहेत. या निमित्ताने हिंदू समाजाचा एकसंघतेचा संदेश दिला जाणार असून धर्माच्या रक्षणासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासोबतच शासन व प्रशासनाने हिंदू समाजाच्या भावना समजून घेत तातडीने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येणार आहे.
क्षेत्रीय मंत्री पांडे म्हणाले की, एक दुष्ट शासक म्हणून इतिहासात ओळख असलेल्या औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे कबर असून आज याचे उदात्तीकरण चालू आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने स्वत:हून ही कबर हटवावी यासाठी निवेदनाद्वारे मागणी करण्यात येणार आहे. याची दखल न घेतल्यास सकल हिंदू समाज रस्त्यावर येऊन आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.