परभणी (प्रतिनिधी) थोर माणसांचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःपेक्षा परंपरेला जास्त महत्त्व देतात. अनेकांच्या त्यागातून परंपरा निर्माण होत असते. त्यामुळे भारतीय संस्कृतीने सुद्धा व्यक्ती पूजेपेक्षा परंपरा मोठी मानली आहे असे प्रतिपादन वेदांतरत्न प्रमोद शास्त्री कुलकर्णी यांनी केले.

ब्रह्मलीन स्वामी वरदानंद भारती यांच्या 105 व्या जयंती उत्सवानिमित्त शहरातील कारेगाव रोडवरील व्यंकटेश मंदिरामध्ये आत्मोन्नती प्रतिष्ठान व संत दासगणू भक्त मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मागील तीस वर्षापासून होणाऱ्या या कार्यक्रमात जेष्ठ कीर्तनकार माधवराव आजेगावकर मधुकरराव बंडेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
विष्णुसहस्रनाम मंडळाच्या सदस्यांसह भाविकां तर्फे तीन विष्णुसहस्रनामाचे सामूहिक पाठ करण्यात आले.
पुढे बोलताना प्रमोद शास्त्री म्हणाले की संतांचे चरित्र सामान्य जीवनासाठी सर्वकाळच मार्गदर्शक असते संतांचे ग्रंथ हीच त्यांची वांग्मयीन मूर्ती असते. सर्वांनी उपासनेला लागावे हीच संतांची इच्छा असल्यामुळे त्यांची पुण्यतिथी अथवा जयंती ही सुद्धा उत्सवकारक असते. प्राण, मन ज्या कार्यक्रमाने उर्ध्वगतीला जातात त्या कार्यक्रमाला उत्सव असे म्हणावे असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाचे मिश्रण असणाऱ्या स्वामी वरदानंद भारतीच्या जीवनात तर्क, वाक् पटूता, सिद्ध हस्तलेखक प्रतिभावान कवी उत्कृष्ट कीर्तनकार अशा अनेक गुणांचा समुच्चय पहावयास मिळतो. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी सांगितलेला उपदेश आपल्या जीवनात किती आचरणात आला हे पहाणेही महत्त्वाची आहे असे ते म्हणाले. अनिल नलबलवार यांच्या हस्ते यती पूजन होऊन आरती प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर आजेगावकर, दिगंबर सिंदूरवाडकर शरद उमरीकर ऋषिकेश औंढेकर योगेश पाथरीकर मंगेश काळे आदींनी परिश्रम घेतले.


