सेलू: (प्रतिनिधी) जगात सद्गुरू बद्दल सर्वांचे एकमत आहे. पण सुख शोधण्याची जागा चुकली आहे. माणसे बाहेर सुख शोधत आहेत. पण सुख आपल्यापाशीच आहे. तेव्हा आपली सुप्त शक्ती जागृत करा. आपल्यातील सुखाचा शोध घ्या. देवाकडे ऐश्वर्य, सत्ता, औदार्य हे तिनही गुण आहेत.जो विठ्ठलाला शरण जातो त्याला काहीही कमी पडत नाही. गतीला योग्य दिशा असेल तरच प्रगती होते. असे प्रतिपादन संतवीर श्रीगुरू बंडा तात्या कराडकर यांनी केले.
शहरातील अलंकापुरीनगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित किर्तनात शुक्रवार ( दि.१३ ) रोजी ते बोलत होते. यावेळी त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या ‘ काय उणे आम्हा विठोबाचे पाय’ या अभंगावर निरूपण केले.
बंडा तात्या पुढे म्हणाले की, ” वारकरी संप्रदाय हा निष्कामतेच्या पायावर उभा आहे. जेथे निष्कामता असते, तेथेच खरे ऐश्वर्य निर्माण होते. आज समाजात विवेकाची जागा विकाराने आणि वैराग्याची जागा वैभवाने घेतली आहे. अशा काळात निष्काम भावनेने केलेली लोकसेवा शाश्वत टिकते. ” असेही ते म्हणाले.
ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पारायणाला भाविकांची अलोट गर्दी
अलंकापुरीनगरीत रोज सकाळी ७.३० ते १० या वेळेत सामुहिक ज्ञानेश्वरी पारायण होते आहे. उत्सपुर्तपणे २१ हजारांहून अधिक भाविक ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करत आहेत.
ज्ञानेश्वरी आणि धार्मिक पुस्तकांची मोठ्या प्रमाणात खरेदी
अलंकापुरीनगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी सांगता पारायण सोहळा स्थळी असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या दिंडीतील पेठभाबळगाव ता.पाथरी येथील मानाचा अश्व आणि पालखीचेही दर्शन भाविक घेत आहेत. सोबतच पुस्तक दालनातून ज्ञानेश्वरी ग्रंथ, संत तुकाराम गाथा आणि धार्मिक पुस्तकांची मोठ्या प्रमाणात भाविक खरेदी करत आहेत.
संतांनी समतेची शिकवण दिली – रामराव महाराज हेंडगे
सर्व संतांनी समतेचा संदेश दिला. समर्पण भावनेने कर्म करायला शिकविले. माणसासोबत माणसासारखे वागावे हे सांगीतले. असे प्रतिपादन ह.भ.प. रामराव हेंडगे महाराज यांनी केले. अलंकापुरीनगरीत आयोजित ज्ञानेश्वरी फिरता पारायण सोहळ्यात शनिवार ( दि. १४ ) रोजी हरी किर्तन सेवेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ” एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते. आपण जीवन सर्वार्थाने सार्थकी लावायचे असेल तर आपण ज्ञानेश्वरी पारायण केले पाहिजे. सर्व संतांची वचने अंगीकारले पाहिजेत. तरच आपण जीवनात सुखी होऊ शकतो. ” असेही ते म्हणाले.


