परभणी (प्रतिनिधी) महिला सर्वच क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. परंतु, असे असले तरी महिलांकडून स्वतःचे आरोग्य मात्र दुर्लक्षित केले जाते. यामुळे महिलांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. महिलांनी स्वतःची शक्ती ओळखून पुढील वाटचाल केल्यास केवळ घरच नव्हे तर देश सुद्धा महिला समर्थपणे चालवू शकतात, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्यचकित्सक डॉ. सारिका बडे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी.हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यावतीने रविवारी महिलांसाठी सर्व रोगनिदान तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले होते. याप्रसंगी व्यासपीठावर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सारिका बडे, विधीज्ञ तथा सामाजिक कार्यकर्त्या माधुरी क्षीरसागर, डॉ. संप्रीया पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमीर तडवी मनीषा गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून परभणी मेडिकल कॉलेज येथे सातत्याने विविध प्रकारच्या आरोग्य शिबिराच्या आयोजन केले जाते. यावेळी माधुरी क्षीरसागर म्हणाल्या, महिला आणि पुरुषांमध्ये समानता आणणे आवश्यक आहे. महिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असणे गरजेचे असून विविध प्रकारच्या अंधश्रद्धा तसेच स्त्रियांना दिले जाणारे दुय्यम स्थान यामुळे महिलांमध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. आर.पी.हॉस्पिटल मेडिकल कॉलेजच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना त्यांच्या आरोग्यविषयक समस्यावर उपचार मिळणे सोपे झाले.
यावेळी डॉ.संप्रिया पाटील म्हणाल्या, आर.पी.हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज येथे महिलांसाठी विविध प्रकारच्या तपासणी उपचार उपलब्ध आहेत. आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून प्रत्येकासाठी सुसज्ज सुविधा या ठिकाणी निर्माण करून दिल्या आहेत. महिलांनी स्वतःचे आरोग्य सांभाळून कुटुंब आणि इतर सर्व व्यवसाय नोकरीला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.
*४८० महिलांची झाली तपासणी*
महिला दिनानिमित्त सर्व रोगनिदान आरोग्य तपासणी शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, सीबीसी, रक्तातील सर्व तपासण्या, अस्थिरोग, नेत्र तपासणी, दंत तपासणी, फिजिओथेरपी या सर्व तपासणी मोफत करण्यात आल्या. या शिबिरात जवळपास ४८० महिलांची ही तपासणी झाली. तसेच ज्या महिलांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, अशा सर्व महिलांची तपासणी करून अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या आर.पी.हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. आणि रिसर्च सेंटर येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिबिर यशस्वितेसाठी कीर्ती चौधरी, वैशाली खांडे, विशाखा शिंदे, पूनम मारवा, अर्चना जाधव, कांचन राठोड, धनश्री कोठुलवार, छाया जावळे, रोहिणी हलगे, सुहासिनी कावळे, रंजना इगदे, छाया गवारे यांनी परिश्रम घेतले.