परभणी,(प्रतिनिधी) : रोजगार हमी योजनेतील सिंचन विहीरी व गाय गोठ्यांचे कुशल बिल तात्काळ वितरित करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.24) जिल्हा परिषद कार्यालयात ठिय्या मांडला.
जिल्ह्यातील कोणत्याही पंचायत समितीकडे सिंचन विहीर, गाय गोठ्यांच्या कामाचा प्रस्ताव सादर केला तर अधिकारी, कर्मचारी त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत, परंतु दलालांमार्फत गेलेल्या प्रस्तावास हे अधिकारी तात्काळ प्रतिसाद देऊ लागले आहेत, असा आरोप करीत या संघटनेने गोठ्याच्या कामच्या वर्क ऑर्डरकरीता 15 हजार, विहीरींच्या कामाच्या वर्क ऑर्डरसाठी 25 हजार असे दर आहेत. पैसे दिले नाही तर एक एक वर्ष वर्क ऑर्डर मिळत नाही, कसबसे वर्क ऑर्डर मिळाली तर कुशलचे बिल पैसे दिल्याशिवाय मिळत नाही. ज्यांनी पैसे दिले नाहीत, अशांना दोन-तीन वर्ष झाले तरी बिल अदा करण्यात आले नाहीत, अशी खंत किशोर ढगे, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोढे, विठ्ठल चोखट, दत्ता परांडे, माऊली शिंदे, शिवाजी चोखट, विकास भोपाळे, विष्णू दुधाटे, गजानन तूरे, उध्दव जवंजाळ, हनुमान चांगभले, नागेश दुधाटे आदींनी व्यक्त केली.