परभणी (प्रतिनिधी) परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी. हॉस्पिटलमधील नवजात अतिदक्षता विभागाने एका चमत्कारिक यशाला गवसणी घातली आहे. सातव्या महिन्यात जन्मलेल्या एका लहान अर्भकाला गंभीर आजारांवर उपचार करून त्याला नवजीवन बहाल करण्यात आले आहे.त्यामुळे आर.पी. हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे.
परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी. हॉस्पिटलमध्ये दाखल या अर्भकाला फुफ्फुसात रक्तस्त्राव, आतड्यांमध्ये पू आणि जीवाणू संसर्ग, शरीरातील ऑक्सिजन वाहक क्षमता कमी होणे तसेच काविळ या गंभीर आजारांनी ग्रासले होते. सदरील अर्भकाचे वजन फक्त 900 ग्रॅम इतके होते. या लहान अर्भकावर तब्बल 72 दिवस उपचार करण्यात आले.
नवजात अतिदक्षता विभागातील बालरोग तज्ञ डॉ. बाबासाहेब गायकवाड, तसेच डॉ.इरफान शेख,डॉ.शीतल रेंगे, डॉ.अरबाज शेख आणि परिचारिका मेघा धपाटे, रोहिणी जोगदंड,निकिता वरपे, ज्योतना सुगंधे तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन या अर्भकावर यशस्वी उपचार केले. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ञांच्या मेहनतीमुळे हे अर्भक आता धोक्याबाहेर असून, त्याची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. या बालकाला काल सुट्टी देण्यात आली असून अर्भकाच्या कुटुंबीयांनी व त्याच्या आई वडिलांनी आ. डॉ.राहुल पाटील तसेच परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे आणि वैद्यकीय अधीक्षक अमीर तडवी यांचे आभार मानले.वैद्यकीय क्षेत्रातील या कामगिरीचे कौतुक होत आहे.ही घटना आर.पी.हॉस्पिटलच्या नवजात अतिदक्षता विभागाच्या उत्कृष्ट सेवेचे आणि समर्पणाचे उदाहरण ठरली आहे.या सर्वांचे आ.डॉ.राहुल पाटील यांनीही कौतुक केले आहे.