परभणी (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने शहरासह जिल्ह्यातील विविध पक्ष, संस्था, प्रतिष्ठान, संघटनांद्वारे सोमवार 14 एप्रिल रोजी अभिवादनासह अन्य भरगच्च कार्यक्रम आयोजित केले होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास शेकडो मान्यवरांसह हजारो नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
गेल्या चार-सहा दिवसांपासून या जयंतीच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील विविध भागातील संस्था, संघटना, प्रतिष्ठानांद्वारे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे नियोजन तसेच वातावरण निर्मितीसुध्दा करण्यात आली . विशेषतः मुख्य रस्ते, मुख्य चौकांमधून निळे झेंडे, छोट्या मोठ्या आकाराचे, विविध आशयांचे होर्डिंग्ज उभारल्या गेले . हे होर्डींग लक्षवेधी ठरले आहेत.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात महापालिका प्रशासनाने सुंदर अशी विद्युत रोषणाई, फुलांच्या हारांद्वारे सजावट केली. तर पोलिस प्रशासनाने या परिसरातील वाहतूकीवर निर्बंध आणून संपूर्ण मार्ग नागरीकांकरीता खूला केला.
सोमवारी सकाळी 8 वाजता या परिसरात भारतीय बौध्द महासभेद्वारे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करुन त्रिशरण व पंचशील घेण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.यावेळी विविध विभागाचे अधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, बौध्दाचार्य, केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दलाचे अधिकारी, सैनिक बौध्द उपासक, उपासिका व बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, सरचिटणीस डी.आय. खेडकर, कोषाध्यक्ष विश्वनाथ झोडपे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
दरम्यान, शहरातील मध्यवस्तीसह चोहोबाजूंच्या वसाहतींमधूनसुध्दा दिवसभर अभिवादनाचे कार्यक्रम, रक्तदान शिबीरे तसेच अन्य समाजोपयोगी उपक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले तसेच सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक शहरातून निघाली.ती मिरवणूक लक्षवेधी ठरेल, असे नियोजन केल्या गेले होते.