परभणी :(प्रतिनिधी) शिवसेना पक्ष वाढवण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. महिलांच्या कणखर नेतृत्वामुळे शिवसेनेची पाळेमुळे घट्ट झाली. आगामी काळात महिला जिल्हा संघटक अंबिकाताई डहाळे यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेना (उबाठा) पक्ष मोठी झेप घेईल, असा विश्वास आमदार डॉ.राहुल पाटील यांनी व्यक्त केला.
शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेना भवन येथून नवीन शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी परभणी जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख ज्योती ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व आ. डॉ. राहूल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे महिला जिल्हा संघटकपदी मनपातील माजी विरोधी पक्षनेत्या तथा महिला आघाडी विधानसभा संघटक अंबिका डहाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल आ. डॉ.पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ.डॉ. पाटील बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख अर्जुन सामाले, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, तालुका प्रमुख नंदू आवचार, संदीप झाडे, सुभाष जोंधळे, वंदना कदम, शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार, बाजार समिती संचालक अरविंद देशमुख, फैजुल्ला पठाण, प्रशास ठाकूर, युवासेना शहर प्रमुख विशु डहाळे, बाळराजे तळेकर, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख उत्तम मुळे, जेष्ठ नागरीक मंच तालुकाध्यक्ष रामराव डोंगरे, विधानसभा प्रमुख दिनेश बोबडे, तालुका संघटक बंडू नाना बिडकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले, शिवसेना सातत्याने महिला सक्षमीकरणासाठी कार्य करत आहे. परभणी जिल्ह्यात देखील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देऊन शिलाई मशीन दिल्या आहेत. त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे केले आहे. तसेच महिला सूतगिरणीच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देत आहोत. शिवसेना उबाठा पक्षात महिलांचे नेतृत्व बळकट व्हावे यासाठी मनपातील माजी विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांना पक्ष कार्याचा मोठा अनुभव असून त्यांच्या नेतृत्वात निश्चितच जिल्ह्यात शिवसेनेत महिला कार्यकर्त्यांची संख्या वाढेल. त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे. त्यामुळे पक्षाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठा लाभ होईल असे आ.डॉ.पाटील म्हणाले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना जिल्हा संघटक डहाळे म्हणाल्या, आ.डॉ. राहूल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आपली निवड करण्यात आली असून आपण ती सार्थ ठरऊन दाखवू मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवण्याची वेळ आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निश्चितच आगामी वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


