परभणी,(प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे 27 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार असून दक्षता आपली सामुदायिक जबाबदारी या संकल्पनेतून या सप्ताहात या खात्याद्वारे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सोमवार 27 ऑक्टोंबर रोजी या सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत शपथ घेवून मुख्यमंत्री यांचा संदेश वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच गर्दीच्या ठिकाणी, पोस्टर्स, बॅनर्सद्वारे जनजागृती सुरु करण्यात आली. बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय, भूमिअभिलेख कार्यालय, पंचायत समिती, पोलिस ठाणे, न्यायालय, बांधकाम विभागाचे कार्यालय, वीज वितरण कंपनी कार्यालय यासह बाजार, बसस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी भ्रष्टाचार निर्मूलना संदर्भात पोस्टर्स व बॅनर लावण्यात आले. त्याद्वारे लाच देणे अथवा लाच देणे हा गुन्हा आहे, या आशयाचे फलक नागरीकांचे लक्ष वेधून घेत होते.
दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, टोल फ्री क्रमांक, ई-मेल आयडी वगैरे गोष्टींचीही जनजागृती या निमित्ताने केली जाणार आहे. लाच मागणार्या लोकसेवकाविरुध्द तक्रार असल्यास नागरीकांनी तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क करावा, असे आवाहन पोलिस उपअधिक्षक महेश पाटणकर यांनी केले आहे.


