परभणी,(0प्रतिनिधी) : नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे. भारताबरोबरच युरोप, अमेरिका तसेच संपूर्ण जगभर नर्सेससाठी रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांनंतर नर्सेसचे योगदान सर्वाधिक महत्त्वाचे असून, विशेषतः कोरोना काळात त्यांच्या सेवाभावी भूमिकेचे मोल समाजाने अनुभवले आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी केले.
परभणी येथील पाथरी रस्त्यावरील डॉ. प्रफुल्ल पाटील शैक्षणिक व रुग्णालय संकुलात बी.एस्सी. नर्सिंग (60 विद्यार्थी) आणि जी.एन.एम. नर्सिंग (40 विद्यार्थी) या अभ्यासक्रमांतील नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. सौ. विद्याताई प्रफुल्ल पाटील यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी अध्यक्षीय भाषणाप्रसंगी बोलतांना डॉ. पाटील म्हणाले की, नर्सिंग स्कूल (ए.एन.एम., जी.एन.एम.), बी.एस्सी. नर्सिंग या अभ्यासक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांना पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी एम.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच परभणी आणि परिसरातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर नर्सिंग शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाईल, असेही ते म्हणाले.
या प्रसंगी सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. उज्वला माकणे, डॉ. विनिता मुरगोड, डॉ. पल्लवी दाशेटवार, तसेच नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य रमेशा के. एच., उपप्राचार्य जयंत देशमुख, प्राध्यापक अनिता हनवते, दिव्या शिंदे, शिफा पठाण, सचिन तिडके, शेख सैफ, श्रद्धा नवघरे यांसह शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


