परभणी ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, निवडणूक प्रमुख चंद्रशेखरजी बावनकुळे आणि राज्यमंत्री तसेच पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली परभणीत भाजपने आगामी निवडणुकांसाठी व्यापक तयारीची धुरा हाती घेतली आहे.
परभणी शहर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा परभणी महानगरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक पूर्व तयारी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत तब्बल २१४ इच्छुक उमेदवारांनी अर्ज जमा करून आगामी निवडणुकीत सक्रिय सहभागाची तयारी दर्शविली.
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला विविध प्रभागांतील उमेदवार, पदाधिकारी, प्रभाग संयोजक, बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने झाली.
कार्यक्रमास मराठवाडा संघटन मंत्री श्री. संजयजी कौडगे, महानगर निवडणूक प्रमुख मा.आ.श्री. सुरेशराव वरपूडकर, ज्येष्ठ नेते श्री. विजयराव वरपूडकर, आयोजक भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजीराव भरोसे, डॉ. केदार खटिंग, प्रमुख वक्ते श्री. विजय वरुडकर आणि मार्गदर्शक श्री. धनंजय खाडिलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजक जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांनी आगामी निवडणुकांसाठी बूथस्तरीय संघटन अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले. प्रमुख वक्ते विजय वरुडकर यांनी सोशल मीडिया रणनीती, आधुनिक निवडणूक व्यवस्थापन आणि मतदारांशी संवादाची तंत्रे यावर मार्गदर्शन केले. धनंजय खाडिलकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वरूप, अधिकार आणि प्रभागनिहाय आव्हानांवर प्रकाश टाकला.
मान्यवरांनी आपल्या भाषणांमध्ये भाजपची विकासनिष्ठ विचारसरणी आणि तळागाळापर्यंत पोहोचण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “सकारात्मक संदेश आणि संघटित कार्यपद्धती हेच विजयाचे खरं सूत्र,” असे मत ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेचा समारोप राष्ट्रगीताने झाला. २१४ इच्छुकांच्या विक्रमी उपस्थितीमुळे आगामी निवडणुकीत परभणीत चुरस वाढणार असून भाजप मोठ्या विजयासाठी सज्ज असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.


