परभणी (प्रतिनिधी) : परभणीकर जनतेने मतरूपी आशीर्वाद आमच्या पारड्यात टाकला आहे. परभणीकरांचा आशीर्वाद वाया जाऊ देणार नाही. येत्या काळात परभणी बदललेली दिसेल असा शब्द महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे.
परभणी महानगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांची सत्ता आली आहे. या दोन्ही पक्षाच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार समारंभ आणि शिवसेनेच्या पदाधिकाºयांची आढावा बैठक अक्षदा मंगल कार्यालय येथे शनिवार, दि.१७ जानेवारी रोजी पार पडली.
यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबजानी दुराणी प्रमुख गंगाप्रसाद आनेराव, प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, शिवसेना महानगर प्रमुख डॉ.विवेक नावंदर, महिला जिल्हा प्रमुख अंबिका डहाळे, काँग्रेसचे माजी उपमहापौर भगवान वाघमारे, माजी उपमहापौर माजुलाला, सय्यद कादर, मुजाहीद खान, रविराज देशमुख, नदीम इनामदार, सूर्यकांत हाके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, तालुका प्रमुख नंदकुमार आवचार, संदीप झाडे, सुभाष जोंधळे, शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार, विशु डहाळे, बाळराजे तळेकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी सर्व नूतन नगरसेवकांचा खासदार संजय जाधव आणि आमदार पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार संजय जाधव म्हणाले, महापालिका निवडणुकीत भाजपाने सत्तेचा दुरुपयोग केला. अफाट पैसा वाटला, परंतू तरीही जनतेने त्यांना नाकारले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वार्डात देखील भाजपाचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला खा. जाधव यांनी दिला.
आमदार डॉ.पाटील म्हणाले, शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये सर्व जाती-धर्मातील नगरसेवकांचा समावेश आहे. राज्यातील सत्तेच्या जोरावर महापालिकेत सत्तास्थापनेचे भाजपाचे स्वप्न परभणीकरांनी धुळीस मिळवले. परभणीकरांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू. सरकारने आम्हाला सावत्रपणाची वागणूक न देता परभणीच्या विकासासाठी निधी द्यावा अशी मागणी केली. आम्ही शासन दरबारी भांडून निधी खेचून आणुत. येत्या पाच वर्षात परभणीचा चेहरा-मोहरा बदलून टाकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
*जिल्हा परिषद निवडणुकीची घेतली बैठक*
परभणी जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने तयारी जोरदार सुरू केली आहे. आजच्या कार्यक्रमात त्यांनी परभणी विधानसभा मतदार संघातील पदाधिकाºयांची आढावा बैठक घेतली. यावेळी गटनिहाय उमेदवारी बाबत चर्चा करण्यात आली.


