परभणी ( प्रतिनिधी) अनु जाती उप वर्गीकरण संदर्भात शासनाकडे आलेला बदर समितीचा अहवाल शासनाने तत्काळ लागू करू नये या मागणीचे निवेदन आज परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आहे.
राज्य शासनाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल आणि त्याची अंमलबजावणी सध्या स्थगित ठेवण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निकालानुसार उपवर्गीकरणासाठी काही कठोर अटी घालण्यात आल्या आहेत, ज्यांची पूर्तता झाल्याशिवाय हा निर्णय घेणे अन्यायकारक ठरेल. म्हणून
इंपिरीअल (Empirical) डेटाचा अभाव: सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, उपवर्गीकरण करण्यासाठी राज्याकडे प्रत्येक पोटजातीचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करणारा वस्तुनिष्ठ आणि अद्ययावत सांख्यिकीय डेटा (Empirical Data) असणे अनिवार्य आहे. सद्यस्थितीत अशा प्रकारचा कोणताही अधिकृत डेटा उपलब्ध नसल्याने घाईने घेतलेला निर्णय कायदेशीर कसोटीवर टिकणार नाही .जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता: जोपर्यंत राज्यात शास्त्रीय पद्धतीने जातीनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत कोणत्या पोटजातीला किती प्रतिनिधित्व मिळाले आहे हे स्पष्ट होणार नाही. अशा माहितीशिवाय केलेले उपवर्गीकरण हे केवळ अनुमानावर आधारित असेल.
अनुसूचित जाती हा एक घटनात्मक प्रवर्ग आहे. त्याचे तुकडे केल्यास या समाजातील अंतर्गत सलोखा बिघडण्याची आणि विविध पोटजातींमध्ये संघर्ष निर्माण होण्याची भीती आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की उपवर्गीकरणाचा कोणताही निर्णय हा न्यायालयीन पुनरावलोकनास (Judicial Review) पात्र असेल. पुरेशी आकडेवारी आणि तर्कसंगत आधार नसल्यास हा निर्णय न्यायालयात रद्द होऊ शकतो, ज्यामुळे प्रशासकीय गोंधळ उडेल. कोणताही अहवाल अपुऱ्या माहितीनिशी तात्काळ लागू करणे योग्य ठरणार नाही.
राज्य शासनाने केवळ राजकीय दबावाखाली येऊन उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊ नये. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे ठोस ‘इंपिरीअल डेटा’ गोळा केला जात नाही आणि सर्व संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा होत नाही, तोपर्यंत बदर समितीचा अहवाल लागू करण्यात येऊ नये अशी मागणी करणारे निवेदन परभणी येथील आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनाच्या वतीने देण्यात आले आहे.
या निवेदनावर संजय बगाटे, कचरुदादा गोडबोले,गौतम भराडे,गौतम पंडित एम एम बरे,राजकुमार येंगडे सुहास पंडित,मधुकर गायकवाड, अनुरथ बनसोडे एस एस घनसावंत दिपक पंचांगे सुनिल सोनवळे राहुल धबाले दिलीप बनकर यांच्या स्वाक्षरी आहेत. ( छाया – संजय घनसावंत)


