परभणी, ( प्रतिनिधी) परभणी तालुक्यातील सावंगी खुर्द व बोबडे टाकळी येथे सोमवारी झालेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी मंगळवार दिनांक 26 मे रोजी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी करून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत
या वादळात शेतातील पॉलिहाऊस, फळबागा, जनावरांचा चारा, जनावरांचे गोठे व शेड, सोलर पंप तसेच विद्युत पोल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
आधीच डिझेल-पेट्रोल टंचाई, खत-बियाण्यांच्या वाढत्या किमती आणि शेतीतील आर्थिक अडचणींमुळे शेतकरी अडचणीत असताना या नैसर्गिक आपत्तीने “दुष्काळात तेरावा महिना” अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ.राहुल पाटील यांनी बाधित भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी संबंधित प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देत कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
तसेच महावितरणच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या पोलचे मोठे नुकसान झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. “कोणत्याही परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असा विश्वास आमदार राहुल पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.
यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख डॉ. दिनेश बोबडे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष उत्तम मुळे युवासेना उपजिल्हा प्रमुख सुनिल पंढरकर, बंडू नाना बिडकर, बबन पंढरकर, बंडू पंढरकर, राजू बोबडे, नारायण वैद्य,दामोदर सानप, कल्याण बोबडे, निवृत्ती हांडगे, विलास बोबडे, गजानन पंढरकर, परमेश्वर पंढरकर, दत्तराव पंढरकर, रावजी चोपडे, गुणाजी बिलवरे, मोइन पठाण, रामेश्वर बिलवरे, तहसीलदार, मंडळ अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, महावितरणचे शाखा अभियंता तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


