गंगाखेड ( प्रतिनिधी) राज्य राखीव पोलीस बलाच्या छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत गंगाखेड येथील जावनाचा पंढरपूर येथे यात्रा बंदोबस्तादरम्यान मृत्यु झाल्याची घटना शनिवार २५ जुलै रोजीच्या पहाटे उघडकीस आली आहे. या जावनाने स्वतः गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याच्या चर्चेने मात्र खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी गंगाखेड शहरातील इंदिरा नगर येथील रहिवासी असलेला रामेश्वर ध्रुपद साबणे हा तरुण छत्रपती संभाजीनगर येथे राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकडीत तैनात होता. आषाढी एकादशीच्या सोहळ्यात पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी असतांना शुक्रवार २४ जुलै रोजीच्या मध्यरात्रीनंतर शनिवार २५ जुलै रोजीच्या पहाटेच्या सुमारास रामेश्वर ध्रुपद साबणे अंदाजे वय २८ वर्ष रा. इंदिरा नगर गंगाखेड याचा मृत्यु झाल्याची घटना घडली असल्याची माहिती शनिवार रोजी पहाटे ४ वाजता रामेश्वर साबणे यांच्या घरी देण्यात आली. ही माहिती समजताच त्यांच्या नातेवाईकांनी पंढरपूरकडे धाव घेतली आहे. रामेश्वर साबणे याने पंढरपूर – कासेगाव रस्त्यावरील त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याच्या चर्चेने मात्र शहरात खळबळ उडाली असुन त्याच्या मृत्युबाबत अधिकृत माहिती समोर आली नसल्याने यामागील गुढ वाढले आहे.


