परभणी : परभणी मेडिकल कॉलेज, आर.पी.हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट परभणी येथे औषधशास्त्र (फार्माकोलॉजी) विभागामार्फत आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये परभणी मेडिकल कॉलेज, परभणी नर्सिंग कॉलेज आणि परभणी कॉलेज आॅफ फिजिओथेरपी येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाची चाचणी घेण्याबरोबरच त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती, बौद्धिक क्षमता आणि विविध आरोग्यविषयक शाखांमधील समन्वय वाढविण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.
यावेळी अधिष्ठाता व संचालक डॉ. प्रमोद शिंदे यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी अशा शैक्षणिक व ज्ञानवर्धक उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. भविष्यातही अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉ.फशीयुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या समन्वयक म्हणून डॉ. ओरूज फातिमा यांनी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक व आयोजकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


