परभणी, (प्रतिनिधी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ (पोक्सो कायदा) या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दि. ५ जुलै २०२६ (रविवार) रोजी सकाळी १० वाजता श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा परभणी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती संजय ए. देशमुख हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांमध्ये पोक्सो कायद्याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात पोक्सो कायद्याच्या तरतुदी, बालकांचे हक्क, लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच कायदेशीर संरक्षण याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, नागरिक व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव बी.एम.काळे यांनी केले आहे.
***


