परभणी, (प्रतिनिधी): भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यास २ जुलै ते ३ जुलै २०२६ या कालावधीत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) अनुराधा ढालकरी यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्यास शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. आकाशात वीज चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराच्या बाल्कनीत, छतावर अथवा उघड्या जागेत थांबू नये. घरातील विद्युत उपकरणे सुरू असल्यास ती तातडीने बंद करावीत. तसेच तारेचे कुंपण, वीज खांब आणि इतर लोखंडी वस्तूंपासून सुरक्षित अंतर राखावे.
पाण्यात उभे राहू नये. शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालासह पशुधन सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले आहे.
याशिवाय, आकाशात वीज चमकत असताना लँडलाईन फोनचा वापर टाळावा. घरातील नळ, पाईपलाईन किंवा इतर धातूच्या वस्तूंना स्पर्श करू नये. कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर शक्यतो टाळावा. वादळी वाऱ्यादरम्यान लोखंडी खांबांवर उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेतातील उघड्या जागेत आश्रय घेऊ नये. उंच झाडाखाली उभे राहणे तसेच धातूच्या उंच मनोऱ्याजवळ थांबणे धोकादायक ठरू शकते.
घरात असताना उघड्या दरवाजातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहण्याचा प्रयत्न करू नये, कारण तेही धोकादायक ठरू शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवून अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. योग्य वेळी सतर्कता बाळगल्यास संभाव्य जीवित व वित्तहानी टाळता येऊ शकते, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
***


