परभणी, (प्रतिनिधी,)महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), जिल्हा कार्यालय परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत प्रगती लोकसंचालित साधन केंद्र, परभणी यांची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार (दि. ६) रोजी श्री मंगल कार्यालय, परभणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला कार्यक्षेत्रातील सुमारे ९०० महिलांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून महिला सक्षमीकरणाचा अनोखा संदेश दिला.
कार्यक्रमास मा. श्री. भूषण काळे (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, परभणी), मा. श्री. रामचंद्र आकुलवार (जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, परभणी), मा. श्री. पी. टी. वटाने (जिल्हा उद्योग केंद्र, परभणी), मा. सौ. सुजाता लाकुंडे (कृषी व व्यवस्थापन तज्ज्ञ, आत्मा, परभणी), मा. सौ. जया नेमाने (जिल्हा समन्वय अधिकारी, परभणी), मा. श्री. संतोष दहिफळे (आयसीआयसीआय बँक अधिकारी), मा. श्री. धनंजय कुलकर्णी (लेखाधिकारी, माविम जिल्हा कार्यालय, परभणी), प्रगती सीएमआरसीच्या अध्यक्षा सौ. मीरा सिद्धार्थ काउत्तकर तसेच व्यवस्थापक श्री. बालाजी वावधने यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून ४९ लाख रुपयांचे कर्ज प्राप्त करून उद्योग व्यवसायात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या सहा बचत गटांचा विशेष सत्कार करण्यात आला. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला असून त्यांच्या कार्याचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय शेतकरी वर्ष म्हणून साजरे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच विविध संकटांवर मात करून आत्मविश्वासाने जीवन जगणाऱ्या एकल महिलांचाही गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे सभागृहात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
उपस्थित मान्यवरांनी महिलांना बचत, उद्योग, शेती, आर्थिक नियोजन, बँकिंग व्यवहार, शासनाच्या विविध योजना आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगती लोकसंचालित साधन केंद्राच्या भविष्यातील वाटचालीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रभावी सूत्रसंचालन व्यवस्थापक श्री. बालाजी वावधने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहयोगिनी सौ. निर्मला ढवळे व सौ. शोभा आचार्य यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. धनगाव यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गट सदस्य आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा, सामाजिक नेतृत्वाचा आणि सामूहिक विकासाचा संदेश देणारी ही वार्षिक सभा प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली.


