परभणी,(प्रतिनिधी) : शहरातील प्रमुख रस्त्यांवर वर्षानुवर्षे उभी असलेली बेवारस व जुनाट वाहने हटविण्यासाठी परभणी शहर महानगरपालिका आणि शहर वाहतूक शाखेने संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी महापालिका कार्यालयात महापौर सय्यद इकबाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
बैठकीस शहर वाहतूक शाखेचे अधिकारी दंतुलवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. शहरातील विविध मुख्य मार्गांवर दीर्घकाळापासून उभी असलेली वाहने वाहतुकीस अडथळा निर्माण करत असून त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. यापूर्वी अशा वाहनांमुळे अपघात तसेच इतर अनुचित घटनाही घडल्याची बाब बैठकीत चर्चिली गेली. यापुढे सार्वजनिक रस्त्यांवर सोडून दिलेल्या किंवा दीर्घकाळ उभ्या असलेल्या वाहनांमुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधित वाहनमालकांना जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच अशा वाहनांवर तातडीने कारवाई करून ती हटविण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना देण्यात आले.
महापौर सय्यद इकबाल यांनी शहरातील वाहनधारकांना सार्वजनिक रस्त्यांवर उभी असलेली जुनी व वापरात नसलेली वाहने तात्काळ हटविण्याचे आवाहन केले. अन्यथा महानगरपालिकेमार्फत संबंधित वाहने जप्त करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वाच्या चौकांमध्ये आणि गर्दीच्या भागात पोलीस चौक्या उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी शहर वाहतूक शाखेला महानगरपालिकेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर बेवारस अथवा दीर्घकाळ वाहने उभी न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.


