परभणी :(प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. या योजनेसाठी ₹३६,५८५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष. शिवाजी भरोसे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर यांचेही शेतकरी हिताचा हा महत्त्वपूर्ण निर्णय साकार करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले.
शिवाजी भरोसे म्हणाले की, महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा असून, शेतकऱ्यांना नव्या उमेदीने शेती करण्यासाठी बळ देणारा ठरेल.
याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यासाठी उद्या मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (Y. B. Chavan Centre) येथे महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री. शिवाजी भरोसे यांनी दिली. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल शेतकरी समाजामध्ये समाधानाचे वातावरण असून, मुख्यमंत्री व महायुती सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तसेच, पात्र सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ पारदर्शक व वेळेत मिळावा, यासाठी संबंधित प्रशासन आणि बँकांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही श्री. शिवाजी भरोसे यांनी व्यक्त केली.


