परभणी ( प्रतिनिधी) प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त उमेदवारांना न्याय मिळावा आणि त्यांच्या प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी आज (१४ जुलै) पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. यापूर्वी प्रशासनाला अनेक निवेदने देऊनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला.
उपोषणकर्त्यांनी कुलगुरू, वनामकृवी प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, यापूर्वी अनेक वेळा मुदतवाढ न देण्याबाबत आश्वासन मागण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर न मिळाल्याने अखेर विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये भरती प्रक्रियेला मुदतवाढ न देणे, वनामकृवी अंतर्गत कार्यरत कंत्राटी कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार वेतनवाढ व ईएसआय सुविधा लागू करणे, परीक्षेच्या तारखा तातडीने जाहीर करणे तसेच प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या प्रलंबित प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण होईपर्यंत त्यांना नोकरीसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देणे, या मागण्यांचा समावेश आहे.
उपोषणकर्त्यांनी इशारा दिला आहे की, मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. तसेच उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास संबंधित प्रशासन व शासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. दिलेल्या निवेदनावर सुनील रणेर, लक्ष्मण शिंदे, श्याम रणेर, अन्सिराम कूट, सोपान ढगे, गोविंद शिंदे, वैभव शिंदे, सय्यद सादात, गजानन शिंदे, आदिनाथ रनेर, स्वप्निल रनेर, दीपक शिंदे, गोपाळ थोरात, हरिपाल थोरात, कृष्णा मोहिते, रामप्रसाद भालेराव, पुंडलिक शिंदे, शिवाजी रणेर, सदाशिव शिंदे, आदित समवेत इतर प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
(फोटो – संजय घनसावंत)


