परभणी,(प्रतिनिधी) : युवक कार्यकर्ते महेश बीडगर यांना केलेल्या मारहाणीच्या प्रकरणात संबंधितांविरोधात कठोर कारवाई करावी, या मागणीकरीता सकल धनगर समाजाच्या वतीने शनिवारी गंगाखेडात मोठा मोर्चा काढण्यात आला. संतप्त मोर्चेकर्यांनी या घटनेतील सूत्रधारास अटक करावी, पोलिस अधिकार्यांविरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली.
युवक कार्यकर्ते बीडगर यांना काहींनी 7 जूलै रोजी गंगाखेड पोलिस ठाण्यातून बाहेर आणून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमानुष मारहाण केली. त्यानंतर बीडगर यांच्या विरुध्दच पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये अॅट्रॉसिटीसह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले, असे या मोर्चेकर्यांनी नमूद करीत बीडगर यांच्या विरुध्दचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करावा, घटनेदरम्यान कर्तव्यात कसूर केल्याबद्दल संबंधित पोलिस अधिकार्यांविरुध्द कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणात निःपक्षपणे तपास करावा, अशी मागणी केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकापासून हा मोर्चा डॉ. आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने सकल धनगर समाजबांधवांसह विविध पक्षांतर्गत नेतेमंडळींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.


