परभणी ( प्रतिनिधी) दापोली, जिल्हा रत्नागिरी येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अतुल मोहोड यांची पंजाब मधील कपूरथला येथील सरदार स्वर्णसिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्थेच्या महासंचालक पदी आगामी तीन वर्षासाठी निवड झाली आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमध्ये महासंचालक पदी निवड झाल्याने कोकण कृषी विद्यापीठाच्या शीरपेच्यात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या महत्वपूर्ण निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी डॉ. अतुल मोहोड यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. सरदार स्वर्ण सिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्था ही भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली कार्यरत असणारी अत्यंत नामांकित संस्था आहे.
ही संस्था राष्ट्रीय पातळीवर जैव ऊर्जेवरील आधुनिक संशोधन, बायोगॅस, बायो इंधन, बायो हायड्रोजन आणि बायोमास तंत्रज्ञान विकसित करणे, कृषी अवशेष, सेंद्रिय कचरा व इतर जैविक पदार्थापासून ऊर्जा निर्मितीचे तंत्र विकसित करणे तसेच नवीन तंत्रज्ञानाचे परीक्षण करणे, विद्यार्थी संशोधक आणि उद्योगासाठी प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करते. अशा महत्वपूर्ण संस्थेच्या सर्वोच्च पदी दापोली येथील अनुभवी शास्त्रज्ञाची निवड झाल्याबद्दल कोकण परिसर व पुसद परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉक्टर अतुल मोहोड हे पुसद येथील गुणवंतराव उपाख्य अण्णासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्राध्यापक विजयराव देशमुख यांचे जावई आहेत. डॉक्टर अतुल मोहोड यांनी कृषी विद्यापीठामध्ये गेली २५ वर्ष अपारंपारिक ऊर्जा स्तोत्र विभागात सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विभाग प्रमुख ते सहयोगी अधिष्ठाता अशा विविध पदावर काम केल्याचा दांडगा प्रशासकीय आणि संशोधनाचा अनुभव आहे. याशिवाय त्यांनी दापोली येथील कृषी विद्यापीठ अभियंता म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. त्यांच्या पुढाकाराने दापोली येथे उभारण्यात आलेले एनर्जी पार्क, गेसिफायर, कोकणातील शेतमालापासून मिळणारा काडीकचरा आणि जंगली झाडाझूडपापासून जैविक कोळसा तयार करण्याचे तंत्रज्ञान, तसेच अपारंपारिक ऊर्जेच्या स्त्रोतापासून विविध प्रकारचे वाळवणी यंत्रे विकसित करण्याच्या संशोधनात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
डॉ. अतुल मोहोड यांच्या गौरवशाली निवडीबद्दल गुणवंतराव उपाख्य अण्णासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एडवोकेट आशिष देशमुख, संस्थेचे सचिव प्राध्यापक विजयराव देशमुख, सहसचिव राजाभाऊ देशमुख, ज्येष्ठ सदस्य गंगारामजी गवळी, सदस्य सर्वश्री डॉ. राहुल देशमुख, हर्षल देशमुख, विशाल देशमुख तसेच शाळा समितीचे सदस्य अजय खैरे, गुणवंतराव देशमुख माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक पोले व गुणवंतराव देशमुख शिक्षण संकुलातील सर्व कर्मचारी वृंद तसेच अजयराव देशमुख फुलउमरीकर, सेवानिवृत्त व्यवस्थापक दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, परभणी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


