परभणी,(प्रतिनिधी) : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेला लढा 2029च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत ताकदीने सुरू ठेवणार असून, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी निर्णायक लढा उभारला जाईल, असे प्रतिपादन धनगर आरक्षण आंदोलनाचे नेते दीपक बोर्हाडे यांनी केले.
धनगर समाजाच्या आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. 17) परभणीत आयोजित निर्णायक महामोर्चा व महामेळाव्यात ते बोलत होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आयोजित या महामेळाव्यास खासदार रामराव वडकुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, विठ्ठलराव रबदडे, मारोतराव बनसोडे, आव्हाड आदी उपस्थित होते. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मे व महापुरुषांना अभिवादन करून बोर्हाडे यांनी भाषणाला सुरुवात केली.

मराठवाड्याची ही संघर्षाची भूमी असून, याच भूमीतून धनगर आरक्षणाच्या लढ्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांच्या धनगर आरक्षणासंदर्भातील भूमिकेवरून सरकारकडे आरक्षणाची मागणी केली. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन यापूर्वी विविध नेत्यांनी दिल्याचा दावा करत बोर्हाडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या धनगर आरक्षणासंदर्भातील पूर्वीच्या वक्तव्यांचे ध्वनिमुद्रण यावेळी उपस्थितांना ऐकविले. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, असे नमूद करीत मागील अनेक वर्षांपासून धनगर समाज आरक्षणाची मागणी करीत असून, आरक्षण मिळाल्यास समाजातील शैक्षणिक व सामाजिक प्रगतीला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
नेत्यांचे राजकारण बाजूला ठेवा; समाजाच्या लेकराबाळांच्या भवितव्याला प्राधान्य द्या, असे आवाहन करत बोर्हाडे यांनी समाजातील सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले. समाजाची एकजूट आणि संघटनात्मक ताकदच आरक्षणाच्या लढ्याला निर्णायक दिशा देऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाचा प्रश्न हा कोणत्याही एका नेत्याचा अथवा पक्षाचा नसून संपूर्ण धनगर समाजाच्या भवितव्याशी संबंधित आहे. त्यामुळे राज्यभरातील आंदोलनकर्ते, उपोषणकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि समाजबांधवांनी या लढ्यात एकत्रितपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही केले. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, कडक उन्हाची पर्वा न करता महामोर्चासाठी विविध पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, उपोषणकर्ते तसेच परभणी जिल्ह्यासह परिसरातील विविध जिल्ह्यांतून धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने परभणीत दाखल झाले होते. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती.


