परभणी (प्रतिनिधी) : पाथरी शहरातील जनता मार्केट मेन रोड परिसरातील ज्वेलर्सचे दुकान चालविणार्या व्यावसायिकाचा मोबाईल हॅक करून अज्ञात व्यक्तीने 7 लाख 5 हजार 300 रुपये काढून घेत आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अन्सारी अब्दुल मुत्तलीफ यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांचे जनता मार्केट परिसरात ज्वेलर्सचे दुकान आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांचा मोबाईल हॅक करून ‘इन्फीलॅक्स टीव्ही’ या नावाचे अॅप डाउनलोड केले. त्यानंतर वेगवेगळ्या खात्यांतून एकूण 7 लाख 5 हजार 300 रुपये काढून घेतले. हा प्रकार 16 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान घडला.
मोबाईलमधून रक्कम परस्पर काढण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर अन्सारी यांनी पाथरी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे तपास करीत आहेत.


