६० विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग; विजेत्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव
परभणी, (प्रतिनिधी) : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ‘मेरा युवा भारत’, परभणी आणि कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. २५) महाविद्यालयात निबंध स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ६० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र इंगळे होते. स्पर्धेदरम्यान विद्यार्थिनींनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांवर तसेच त्यांच्या कार्यावर आपल्या वैचारिक व सृजनशील लेखनातून प्रकाश टाकला. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागाचे आणि प्रभावी मांडणीचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
यावेळी डॉ. नसीम बेगम यांनी विद्यार्थिनींना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची माहिती देत त्यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो)च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत प्रथम क्रमांक रूपाली नागरे, द्वितीय क्रमांक प्रतीक्षा देशमुख, तर तृतीय क्रमांक शेख फातेमा शेख मोहसीन यांनी पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी रुपाली मोधळ, गौरी तारे, नर्गीस खान जावेद खान, मोहिनी शेळके आणि निकिता पठाडे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. महेश जाधव, डॉ. नसीम बेगम, ‘मेरा युवा भारत’चे कक्ष अधिकारी गजानन गाडेकर तसेच तालुका समन्वयक दीपक खुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थिनींच्या सहभागामुळे आणि उत्साहामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
***


