जिंतूर (प्रतिनिधी) तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ व युवकांनी शनिवारी (२६ सप्टेंबर) पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. सकाळी १० वाजता सुरू झालेले हे आंदोलन सायंकाळी साडेपाच वाजता लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, पंधरावा वित्त आयोग, मनरेगा तसेच विविध योजनांमधील विकासकामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी यापूर्वी संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर मुजाहेद कादरी, प्रभाकर इखे , अन्वर पटेल यांच्यासह अनेक युवक पाण्याच्या टाकीवर चढले. आंदोलनस्थळी शेकडो ग्रामस्थ जमा झाले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराविरोधात तसेच ग्रामविकास अधिकारी धरणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
दुपारी सुमारे अडीच वाजता पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी भोसले, विस्तार अधिकारी शिवराम ढोणे, विस्तार अधिकारी इडोळे आणि अभियंता देशमुख आंदोलनस्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून खाली उतरण्याची विनंती केली; मात्र चौकशीबाबत ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेण्यास युवकांनी नकार दिला.
अखेर सायंकाळी साडेपाच वाजता प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची चौकशी १५ दिवसांच्या आत पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल, असे आश्वासन सहाय्यक गटविकास अधिकारी भोसले यांनी दिले. त्यानंतर युवक पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले आणि आंदोलन समाप्त करण्यात आले.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत आडके, पीएसआय महादेव गायकवाड, पीएसआय नारायण गायकवाड, बीट जमादार प्रताप साळवणे, प्रकाश मोरे, गोपनीय शाखेचे तालुकाधिकारी जिया पठाण यांच्यासह पोलीस कर्मचारी आंदोलनस्थळी तैनात होते.
आता प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार १५ दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर केला जातो का, याकडे कौसडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


