परभणी,(प्रतिनिधी) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच निवडणूक प्रक्रियेतील निर्णयांची निष्पक्ष चौकशी करण्याच्या मागणीसाठी परभणीत काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.28) आंदोलन करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा हीच अंतिम मागणी नसून, त्यांच्या कार्यकाळात निवडणूक प्रक्रियेत घेण्यात आलेल्या निर्णयांची, त्यातून कोणाला राजकीय फायदा झाला यासह संबंधित सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. चौकशीअंती वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेबाबत सत्ताधारी पक्षाकडून निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली जात असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित होणार्या प्रश्नांची अधिक गांभीर्याने तपासणी होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक आयोगाने मात्र भारतीय निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक ठेवण्याची आपली घटनात्मक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे अजित वरपुडकर, शेख खाजा शेख मेहबूब, सत्तार पटेल, तब्बू पटेल, साबेर कुरेशी, सुहास पंडीत यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ‘मताचा अधिकार अबाधित ठेवा’, ‘निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवा’ आणि ‘जवाबदारी निश्चित करा’, अशा घोषणा देण्यात आल्या.


