परभणी, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ग्रामपंचायत व शाळास्तरावर स्वच्छता मोहीम, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, मानवी साखळी तसेच स्वच्छतादूतांचा सन्मान अशा विविध उपक्रमांचे आज बुधवार दिनांक.30 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि विकसित भारताच्या संकल्पनेपर्यंत विविध विषयांवर जनजागृती करण्यात येत असून, त्याला नागरिक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या उपक्रमामध्ये पालम तालुक्यातील धनेवाडी व आनंदवाडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच ग्रामपंचायत गोपा येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. वक्तृत्व स्पर्धेत विविध गटांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धांमध्ये ९ ते १० या वयोगटामध्ये नंदिनी चव्हाण, पूनम सूर्यवंशी व समृद्धी भालेराव, ६ ते ८ या वयोगटामध्ये तनुजा नारायण रेंगे, आदित्य साहेब धाबळे व आकांक्षा दत्तराव रेंगे, तर ५ वर्षे वयोगटामध्ये संघामित्रा सिद्धार्थ धाबळे व संस्कृती लक्ष्मण रेंगे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
कौडगाव येथील जिल्हा परिषद प्रशाला, जांब केंद्र ब्राह्मणगाव येथे शाळेच्या मागील परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ग्रामपंचायत वालूर येथे नाली व सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतागृहांची सफाई मित्रांच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत करवली (ता. जिंतूर), शिवाजीनगर-बाभळगाव (ता. पाथरी), देवेगाव (ता. पाथरी) आणि पारवा (ता. पालम) येथेही सेवा संकल्प अभियानांतर्गत स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले.
ग्रामपंचायत वाई येथे स्वच्छतादूत अविनाश दौंड यांचा सफाई मित्र कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
शाळेतील स्वच्छता उपक्रमात सहकार्य करणारा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी स्वराज अविनाश दौंड याचाही पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अविनाश दौंड, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण वाव्हळे, शिक्षकवृंद आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचे समन्वयक डी. आर. कामीटे आदी उपस्थित होते.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, पाथरी येथे आज बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी ‘विकसित भारत-२०४७’ या उपक्रमांतर्गत चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता ६ वी ते ८ वी गटात अंकिता मुंगे हिने प्रथम, शुभांगी बिक्कड हिने द्वितीय तर संस्कृती तोंडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता ९ वी व १० वी गटात शिवकन्या डोंगरे हिने प्रथम तर भक्ती बिक्कड हिने द्वितीय क्रमांक मिळविला.
दरम्यान, कै. मातोश्री धोंड्याबाई प्राथमिक शाळा, लोणी येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या सहभागातून मानवी साखळीच्या माध्यमातून स्वच्छता व जनजागृतीचा संदेश देण्यात आला. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती व शैक्षणिक संस्थांमध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे ‘स्वच्छ गाव-सुंदर गाव’ संकल्पनेला बळ मिळत असून, स्वच्छतेच्या कार्यात विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, सफाई मित्र आणि स्थानिक प्रशासनाचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
**


